---Advertisement---
जळगाव महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी आता अधिक कडक भूमिका घेतली आहे. कर थकवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देत प्रशासनाने ७९ मोठ्या थकबाकीदारांची यादी जाहीर केली आहे. दंडमाफी योजनेची मुदत संपण्यासाठी केवळ दोन दिवस उरले असताना ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत थकीत रक्कम न भरल्यास १ एप्रिलपासून संबंधित मालमत्तांवर थेट टाळे ठोकून जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या यादीत केवळ वैयक्तिक मालमत्ताधारकच नाहीत, तर काही नामांकित सामाजिक संस्था आणि त्यांच्या सभागृहांचाही समावेश आहे. त्यामध्ये क्षत्रिय मराठा समाजाचे सामाजिक व सांस्कृतिक सभागृह, वैश्यवाणी समाज मंदिर, जळगाव जिल्हा सेवा समिती, नाभिक समाज जिल्हा ट्रस्ट यांसह एमआयडीसीमधील काही प्लास्टिक उद्योग, पेपर मिल्स, ॲग्रो उद्योग, तसेच काही राजकीय नेत्यांची कार्यालये आणि खासगी व्यावसायिक आस्थापनांचा समावेश आहे.
दरम्यान, महापालिकेच्या कर संकलन विभागाने राबवलेल्या मोहिमेतून आतापर्यंत ७८ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. उर्वरित थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही कर भरणा केंद्रांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. रविवार आणि सोमवारीही केंद्रे सुरू ठेवून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.









