---Advertisement---
शहरातील गुरुदत्त नगर भागात एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ५० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना समोर आली आहे. घरमालक कामानिमित्त कुटुंबीयांसह मुंबईला गेले असताना २६ ते ३० मार्च दरम्यान ही घरफोडी झाली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुदत्त नगरातील यश हाईट्ससमोर राहणारे अमोल गंगाधरराव भेंडे (वय ३८) हे पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. २६ मार्च रोजी ते कामानिमित्त पत्नी, मुलगा आणि सासू-सासऱ्यांसह मुंबई येथे गेले होते. काम आटोपून ३० मार्च रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ते जळगावी घरी परतले. तेव्हा त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, हॉलमधील लाकडी कपाट उघडे होते, परंतु त्यातील साहित्य सुरक्षित होते.
मात्र, चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाट उघडून त्यातील लॉकरमध्ये ठेवलेली ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात चोरी झाल्याची खात्री होताच अमोल भेंडे यांनी सकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









