---Advertisement---
यावल : तालुक्यातील मौजे चितोडी खुर्द येथील आदिवासी भिल (अनुसूचित जमाती) बांधवांच्या जमिनींवरील अतिक्रमण प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती यावल यांना पत्र पाठवून संबंधित प्रकरणात आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
भीमशक्ती सामाजिक संघटना, जळगाव यांच्या निवेदनानंतर हे प्रकरण पुढे आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, अनेक वर्षांपासून आदिवासी भिल समाजातील गरीब कुटुंबांच्या जमिनींवर काही व्यक्तींनी बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे संबंधित कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी संबंधित विभागामार्फत सखोल पाहणी करून पात्र आदिवासी बांधवांचे अतिक्रमण नियमानुसार दूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणाचा अहवाल तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
या कारवाईमुळे आदिवासी बांधवांमध्ये दिलासा व्यक्त होत असून प्रशासन आता प्रत्यक्ष स्तरावर कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









