---Advertisement---
जिल्ह्यात 92 हजाराहून अधिक थकबाकीदारांना 512 कोटींची कर्जमाफी, अडीच लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभाची शक्यता
जळगाव 14 मे : जिल्ह्यात बेमोसमी पाऊस, गारपीट, अतीवृष्टी, दुष्काळ अवर्षण, नापिकीसह शेतमालास योग्य बाजारभाव न मिळणे वा अनेकविध कारणांतून पीककर्जाची परतफेड शेतकऱ्यांकडून झालेली नाही. यामुळे हजारो शेतकरी पीककर्ज थकबाकीदार यादीत गेले आहेत. अशा परिस्थितीत बळीराजाला थकीत पीककर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासह कृषी क्षेत्राला उभारी दिली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात सुमारे 92 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यतची कर्जमाफी तर नियमित पीककर्जपरतफेड करणाऱ्या अडीच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ मिळण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’ अंतर्गत कर्जमाफीची अंमलबजावणीसाठी सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांचा अहवाल मागविण्यात आला होता. त्यानुसार राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’अंतर्गत जळगाव जिल्ह्यात सहकार विभागांतर्गत जिल्हा उपनिबंधकांनी जिल्ह्यातील थकबाकीदार आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांची माहिती संकलित करण्याचे काम पूर्ण केले आहे.
थकीतांचे 512 कोटीचे कर्ज माफ होणार
जिल्हा उपनिबंधक सहकार विभागाकडून जिल्हा बँकेच्या 92 हजार 609 थकबाकीदारांचे दोन लाखांपर्यंत मर्यादेचे कर्ज (मुद्दल व व्याज) 512 कोटी 32 लाख रूपये, कर्जमाफीचा लाभ जून 2026 दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी लाभ होण्याची शक्यता आहे.
नियमित परतफेड कर्जदारांना प्रोत्साहन लाभ
केवळ थकबाकीदारच नव्हे, तर प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचीही दखल प्रशासनाने घेतली आहे. जिल्ह्यातील 2 लाख 43 हजार 246 सभासदांनी नियमित कर्ज परतफेड केली आहे. या नियमित कर्जदारांची माहितीदेखील पूर्णपणे भरण्यात आली असून, त्यांनादेखील शासनाकडून प्रोत्साहन लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कर्जमाफीत अडीच लाख, कर्जमुक्तीत पावणेदोन लाख लाभार्थींंचा समावेश
तत्कालीन भाजपा शासनाने श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत 2 लाख 42 हजार 541 पीककर्जदार शेतकऱ्यांना 962.95 कोटीची कर्जमाफी दिली होती. तर एक लाख एक हजार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 153 कोटी 87 लाख रूपये असा प्रोत्साहन लाभ दिला होता.
तसेच 2020-21 दरम्यान मविआ सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती अंतर्गत पावणे दोन लाख थकीत शेतकऱ्यांना 900 कोटीं कर्जमाफ आणि दिड हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभातून दिलासा देण्यात आला होता.
थकीतांची माहिती पोर्टलवर अपलोड
असे असले तरी गेल्या सप्टेंबर 2025 दरम्यान पुन्हा थकबाकीत आलेल्या शेतकऱ्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’ अंतर्गत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून, तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून जिल्ह्यातील पीककर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे सादर केली आहे. यात सर्वात जास्त जिल्हा बँकेचे थकीत पीककर्जदारांची यादी असून थकीत सभासदांची माहिती पोर्टलवर भरण्याचे काम पूर्ण झाले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
थकबाकीदारांना याद्यांची प्रतिक्षा
ही माहिती संपूर्णपणे संकलित झाल्यामुळे आता या शेतकऱ्यांना थकबाकीतून मुक्त करण्यासाठी तांत्रिक अडथळे दूर झाले आहेत. शासनाकडून उपनिबंधक कार्यालयांना तसेच बँकांना कर्जमाफीच्या याद्या कधी प्राप्त होणार, याकडे लक्ष लागले आहे.
कर्जमाफी मिळणार, पण आधार प्रमाणीकरण आवश्यक
राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि प्रोत्सान अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असले तरी, या दोन्ही लाभांसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक असून आधार पडताळणी नंतरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी अथवा प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शासनाच्या सूचनेनुसार माहिती शासनाच्या पोर्टलवर जिल्हा उनिबंधक कार्यालयाकडून भरण्यात आलेली आहे. पात्र थकीबाकीदार शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहू नये, हा उद्देश आहे.
गौतम बलसाने, जिल्हा उपनिबंधक, जळगाव.









