---Advertisement---
जळगाव : कामावरुन कमी केलेल्या कामगारांनी दोन महिन्यांचा अधिक पगार द्या म्हणत., जनरल मॅनेजरसोबत हुज्जत घातली. त्यानंतर त्यांना मारहाण करीत लोखंडी पाईप त्यांच्या डोक्यावर मारला. मॅनेजर उपचार घेतल्यानंतर तक्रार देण्याकरीता पोलीस ठाण्यात जात असतांना त्यांना रस्त्यात अडवित पुन्हा मारहाण केली. ही घटना दि. ३१ मार्च रोजी एमआयडीसीतील तुलसी पाईप कंपनीत घडली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशातील मुज्जफफरनगर येथील रजत जसवीर शर्मा (वय ३१, ह.मु. तुलसी पाईप) हे प्रोडक्शन मॅनेजर तर कुंवर सुभाष प्रतापसिंग हे जनरल मॅनेजर म्हणून काम करतात. दि. ३१ मार्च रोजी दुपारच्या सुमारास कुंवर प्रतापसिंग हे प्लांट राऊंडवर असतांना कंपनीतून कमी केलेले आनंद भागवत पवार, राहूल भागवत पवार, सागर मुरलीधर नफते हे त्यांना भेटले. त्यांनी कामावरुन कमी केल्यामुळे दोन महिन्यांचा अधिक पगार आम्हाला द्या असे म्हणत त्यांच्यासोबत हुज्जत घालीत मारहाण करु लागले. कुंवर प्रतापसिंग हे पळत प्रोडक्शन हॉलमध्ये धावत आले, त्यावेळी संशयित देखील त्यांना मारण्यसाठी त्याठिकाणी आले. रजत शर्मा हे त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेले असता, आनंद पवार याने हॉलमध्ये पडलेला लोखंडी पाईप फेकून मारल्याने रजत शर्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
कंपनीतील कामगारांनी जखमी शर्मा यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी जात असतांना संशयितांनी त्यांना नेरीनाका येथे अडविले. तसेच गाडीच्या खाली उरवून पुन्हा लाथाबुक्क्यांसह लाकडी दांडक्यांनी मारहाण करीत जखमी केले. मारहाण केल्यानंतर संशयितांनी शर्मा यांना तू जळगावमध्ये ज्या ठिकाणी भेटशील, त्या ठिकाणी तुला मारु अशी धमकी दिली. जखमी रजत शर्मा यांनी एमआयडीसी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन संशयित आनंद भागवत पवार, राहुल भागवत पवार, सागर मुरलीधर नफते याच्यासह चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









