---Advertisement---
नवी दिल्ली :
इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतावरही त्याचा परिणाम जाणवत असल्याने केंद्र सरकारने देशांतर्गत उद्योग आणि शेती क्षेत्राला दिलासा देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
केंद्र सरकारने अत्यावश्यक कच्च्या मालावरील आयात शुल्क थेट शून्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अमोनियम नायट्रेटसह अनेक पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील शुल्क माफ करण्यात आले आहे. ही सवलत 2 एप्रिल ते 30 जून या कालावधीत लागू राहणार असून त्यामुळे खत आणि रासायनिक उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे.
युद्धामुळे पुरवठा साखळीवर परिणाम होऊन उत्पादन खर्च वाढत असताना, सरकारच्या या निर्णयामुळे कंपन्यांवरील आर्थिक ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः खत उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या अमोनियम नायट्रेटवरील सवलतीमुळे खत क्षेत्राला अतिरिक्त लाभ मिळणार आहे.
दरम्यान, मध्यपूर्वेतील तणावामुळे होर्मुज खाडी मार्गे होणाऱ्या जहाज वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही भारतीय जहाजे या मार्गावर अडकली असून एलपीजी गॅससह इतर पुरवठ्यावर तात्पुरता परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.
युद्धाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून देशातील उद्योग आणि नागरिकांवर परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.









