---Advertisement---
अमळनेर : गांधली परिसरात उष्टे-खरकटे पाणी अंगावर पडल्याच्या किरकोळ कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन तिघांवर तीक्ष्ण हत्यार व विटांनी हल्ला करण्यात आल्याची घटना ६ मे रोजी रात्री घडली. या घटनेत तिघे जण जखमी झाले असून अमळनेर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अतुल सुरेश कोळी (रा. गांधली, अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ६ मे रोजी रात्री सुमारे ९ वाजता ते गोठ्यात जनावरांना चारा-पाणी करत असताना शेजारील संगीता संतोष पाटील या घराबाहेर भांडी घासत होत्या. यावेळी त्यांच्याकडून खरकटे पाणी अतुल कोळी यांच्या अंगावर उडाल्याने वाद निर्माण झाला.
या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या अतुल कोळी यांना “ही आमची जागा आहे,” असे म्हणत शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी घरी जाऊन ही माहिती कुटुंबीयांना दिली. काही वेळाने समजावण्यासाठी कोळी कुटुंबीय संबंधितांच्या घरी गेले असता वाद आणखी चिघळला.
यावेळी संगीता संतोष पाटील, त्यांचे पती संतोष दोधु पाटील व मुलगा जयेश संतोष पाटील यांनी शिवीगाळ करत चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. परिस्थिती गंभीर होताच जयेश पाटील याने तीक्ष्ण हत्याराने अतुल कोळी व नवल कोळी यांच्यावर वार केल्याने दोघे जखमी झाले. तसेच संगीता पाटील यांनी अतुल यांच्या वहिनीवर विटांनी हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेनंतर जखमींनी उपचार घेतल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२) व ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.









