सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; मंत्र्यांच्या ताफ्यांवरही होणार कारवाई

---Advertisement---

 

मुंबई : राज्यातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आगामी सर्व परदेश दौरे रद्द करावेत, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंजूर झालेले दौरेही तात्काळ रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौरे टाळण्याचे आणि इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या विविध विभागांतील मंत्री आणि अधिकारी अभ्यास दौरे, बैठका आणि इतर कामांसाठी परदेशात जात असतात. मात्र, सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विदेशी चलन बचत आणि खर्च नियंत्रणासाठी हे दौरे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


दरम्यान, राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचाही आढावा घेतला जाणार आहे. कोणत्या मंत्र्यांच्या ताफ्यात किती वाहने आहेत, याची माहिती गोळा केली जाणार असून अतिरिक्त वाहनांची संख्या कमी करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाकडून यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अनेक मंत्र्यांच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात वाहनांचा वापर होत असल्याची चर्चा असून आता त्यावर निर्बंध आणले जाणार आहेत. तसेच इंधन बचतीसाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनीही आपला नियोजित लंडन-पॅरिस दौरा रद्द केला आहे. देशहिताला प्राधान्य देत आणि पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्यावर भर देण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांनाही काही महत्त्वाची आवाहने केली आहेत. त्यामध्ये सोन्याची खरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, परदेश प्रवास टाळा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, नैसर्गिक शेतीचा अवलंब करा आणि स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढवा, अशी आवाहने करण्यात आली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---