---Advertisement---
तेहरान/वॉशिंग्टन : इराण आणि युनाइटेड स्टेट्स यांच्यातील तणाव दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षादरम्यान आता इराणकडून करण्यात आलेल्या एका मोठ्या विधानामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. इराणने थेट इशारा देत, जर अमेरिकेकडून पुन्हा हल्ला झाला तर युरेनियम संवर्धन ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत.
इराणच्या संसदीय आयोगाचे प्रवक्ते इब्राहिम रिझई यांनी धक्कादायक विधान करत सांगितले की, देशावर पुन्हा हल्ला झाल्यास संसद तात्काळ ९० टक्के युरेनियम संवर्धनाला मंजुरी देऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, ९० टक्के संवर्धित युरेनियम अण्वस्त्र निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणामुळे परिस्थिती अधिक चिघळल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. अमेरिकेची प्रमुख मागणी इराणने आपले अणु साठे आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली द्यावेत, अशी आहे. मात्र, इराणने स्पष्टपणे माघार घेण्यास नकार दिल्याने संघर्ष अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, युरेनियम २० टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत संवर्धित करणे हा सर्वात कठीण टप्पा असतो. त्यानंतर ९० टक्क्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तुलनेने कमी वेळ लागतो. त्यामुळे इराणच्या या इशाऱ्यामुळे अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांची चिंता वाढली आहे.
या संघर्षाचा परिणाम केवळ मध्य-पूर्वेपुरता मर्यादित राहिलेला नाही. युद्धात थेट सहभागी नसलेल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवरही त्याचा मोठा परिणाम होत असून कच्च्या तेलाच्या किमती, ऊर्जा संकट आणि जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता वाढत असल्याचे दिसून येत आहे.









