पोलिओ डोस ठरला जीवघेणा? चिमुकलीचा अचानक मृत्यू; मृतदेह मांडीवर घेऊन आजोबांनी रुग्णालयात काढली रात्र, रुग्णालयातील अमानवीय प्रकाराने संताप…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील टहाकळी गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पोलिओ डोस आणि लस दिल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घडलेल्या अमानवीय प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सचिता दीपक बोरसे या अडीच महिन्यांच्या बालिकेला जिल्हा परिषद शाळेत आयोजित लसीकरण मोहिमेदरम्यान पोलिओ डोस आणि अन्य लस देण्यात आली होती. मात्र लस दिल्यानंतर काही मिनिटांतच तिची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांनी तातडीने तिला चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

मयत बालिकेचे वडील दीपक बोरसे हे भारतीय सैन्यात कार्यरत असून सध्या अयोध्या येथे सेवेत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पोलिसांच्या मदतीने बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला.

मात्र येथे घडलेला प्रकार अधिक धक्कादायक ठरला. रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. परिणामी, बालिकेचे आजोबा तुळशीदास मराठे हे अडीच महिन्यांच्या निष्पाप नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन रात्रभर शवविच्छेदन विभागाबाहेर बसून होते.

पहाटे हा हृदयद्रावक प्रकार अनेकांच्या निदर्शनास आला. आजोबा आपल्या नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन बसल्याचे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. या घटनेची माहिती पसरताच रुग्णालय प्रशासन हलले आणि अखेर मृतदेह

“शवविच्छेदन रात्री करू नका, एवढीच आमची मागणी होती. पण किमान माणुसकी म्हणून मृतदेह शवपेटीत ठेवायला हवा होता. रात्रभर मी माझ्या नातीला मांडीवर घेऊन बसलो, कुणालाही दया आली नाही,” अशी वेदनादायक प्रतिक्रिया आजोबा तुळशीदास मराठे यांनी व्यक्त केली.

मात्र पोलिओ डोसनंतर बालिकेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत चौकशीची मागणी होत आहे. तसेच रुग्णालयातील हलगर्जीपणा आणि असंवेदनशील वागणुकीबाबत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या संपूर्ण घटनेमुळे आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून “माणुसकी हरवली का?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---