अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई; उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, 143 कॉल्स आणि आर्थिक व्यवहारांमुळे वाढल्या अडचणी

---Advertisement---

 

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अशोक खरातसोबत आर्थिक व्यवहार आणि संशयास्पद संबंध असल्याच्या आरोपांवरून उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांना निलंबित करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निलंबनाचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.
अभिजीत भांडे आणि अशोक खरात यांच्यातील कॉल रेकॉर्ड तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 4 एप्रिल 2025 ते 15 मार्च 2026 या कालावधीत दोघांमध्ये तब्बल 143 वेळा फोनवर संपर्क झाल्याचे उघड झाले आहे. त्यामध्ये खरातने 83 वेळा तर भांडे यांनी 60 वेळा कॉल केल्याचे तपासातून समोर आले. या संभाषणांचा एकूण कालावधी 10,037 सेकंद म्हणजे जवळपास तीन तासांचा असल्याचे सांगितले जात आहे.


तपासात 7 जुलै 2025 रोजी एका दिवसात 10 कॉल, तर 23 नोव्हेंबर 2025 रोजी 14 कॉल झाल्याची नोंद समोर आली आहे. तसेच 7 ऑगस्ट 2025 रोजी दोघांमध्ये 11 मिनिटांची चर्चा झाल्याची माहितीही समोर आली आहे. याच कॉल रेकॉर्डच्या आधारे महसूल विभागाने कारवाई करत भांडे यांच्या निलंबनाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अभिजीत भांडे यांनी अशोक खरातच्या पत्नी आणि मुलीच्या नावावर असलेल्या जमिनी व मालमत्तांमध्ये गुंतवणूक केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. खरातशी संबंधित विविध व्यवहारांमध्ये भांडे यांचा सहभाग असल्याची चर्चा सुरू असून या प्रकरणामुळे महसूल विभागातील इतर अधिकाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे.


शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरात प्रकरणात आधीच अनेक राजकीय नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. या प्रकरणातील प्रत्येक संबंधित व्यक्तीची चौकशी केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील तपासाचा फेरा प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---