---Advertisement---
पाचोरा तालुक्यातील तारखेडा व परिसरातील अनेक शेतकऱ्यांची कपाशी खरेदी व्यवहारातून कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत शिवसेना पाचोरा तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात सोमवारी पाचोरा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
पाचोरा येथे गेल्या सुमारे वीस वर्षांपासून वास्तव्यास असलेले कपाशी व्यापारी हरिदास मोहनदास ठक्कर यांनी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडून उधारीवर कपाशी खरेदी केली होती. काही शेतकऱ्यांना धनादेश दिले असले तरी मोठ्या प्रमाणावर रक्कम अद्याप थकीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित व्यापारी अचानक कुटुंबासह फरार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी पीडित शेतकरी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून त्यांनी आपली तक्रार नोंदवली. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, कपाशी विक्री करूनही त्यांना त्यांच्या मालाचे पैसे मिळाले नसून मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. या प्रकरणात आणखी अनेक शेतकरी बाधित असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील यांनी पोलीस प्रशासनाकडे संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध फसवणूक, विश्वासघात व आर्थिक अपहाराचे गुन्हे दाखल करून तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच मोबाईल सीडीआर, बँक व्यवहार, यूपीआय व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज, टोल नाका नोंदी आदींची तपासणी करून आरोपीचा शोध घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पाचोरा तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील यांनी जाहीर आवाहन करत म्हटले आहे की, संबंधित व्यापाऱ्यामुळे आर्थिक नुकसान झालेल्या सर्व शेतकरी बांधवांनी पुढे येऊन पाचोरा पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र तक्रार दाखल करावी. तसेच उपलब्ध असलेली पावती, बिल, धनादेश, बँक व्यवहाराची माहिती, मोबाईल संदेश व इतर पुरावे प्रशासनाकडे सादर करावेत.
अधिकाधिक शेतकरी पुढे आल्यास सर्व तक्रारी, पुरावे व माहिती एकत्रित करून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा (EOW) व सायबर विभागाकडे सामूहिक स्वरूपात पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “शेतकऱ्यांची एकजूट, ठोस पुरावे आणि सामूहिक लढा यामुळेच न्याय मिळू शकतो,” असे आवाहन राजेंद्र पाटील यांनी केले.









