तपत कठोरे येथे भीषण दुर्घटना! डंपरखाली चिरडून ५५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी डंपर पेटवला…!

---Advertisement---

 

मुक्ताईनगर तालुक्यातील तपतकठोरे शिवारात सुरू असलेल्या पाणंद रस्त्याच्या कामादरम्यान बुधवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. गौण खनिजाने भरलेल्या डंपरखाली चिरडून ५५ वर्षीय शेतकरी अनिल मुकंदा पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासोबत असलेली चार वर्षांची नात परी कौस्तुभ पाटील ही सुदैवाने बचावली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त डंपरला आग लावत तीव्र संताप व्यक्त केला.

‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील तपतकठोरे शिवारात रस्त्याचे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास मुरूमाने भरलेला डंपर रिव्हर्स घेत असताना हा अपघात झाला. मृत शेतकरी अनिल पाटील हे आपल्या नातीसह दुचाकीवरून शेतातून परतत होते. त्याचवेळी डंपर त्यांच्या दिशेने मागे येत असल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी आणि स्वतः अनिल पाटील यांनी चालकाला थांबवण्यासाठी आरडाओरडा केला.

मात्र चालकाने कानात हेडफोन घातले असल्याने त्याला कोणाचाही आवाज ऐकू आला नसल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. परिणामी डंपरने दुचाकीला जोरदार धडक देत अनिल पाटील यांना चिरडले. धडकेनंतर डंपरने त्यांना तब्बल २५ ते ३० फूट फरफटत नेल्याचे सांगितले जात आहे. त्यातच, लहान मुलगी डंपरखालून बाहेर येताना दिसताच चालकाने वाहन थांबवले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

अपघातानंतर जखमी अवस्थेतील अनिल पाटील यांना तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती तपत कठोरे गावात पोहोचताच संतप्त नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातास कारणीभूत ठरलेल्या डंपर पेटवून दिले. काही क्षणांतच डंपर पूर्णपणे जळून खाक झाला.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल आणि पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. नगरपरिषदेचा अग्निशमन बंबही पाचारण करण्यात आला. मात्र अग्निशमन कर्मचारी उपलब्ध नसल्याने पोलिसांनी स्वतः आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत डंपर पूर्णपणे जळून खाक झाला होता.

मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून त्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून पाणंद रस्त्यांच्या कामांदरम्यान सुरक्षेचे नियम कितपत पाळले जातात, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---