---Advertisement---
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाशी संबंधित एक किस्सा सांगितल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला असून संबंधित व्हिडिओही चर्चेचा विषय ठरत आहे.
जळगावातील राजकारणात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय मतभेद सर्वश्रुत आहेत. विविध मुद्द्यांवर दोन्ही नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येतात. अशातच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित महायुतीच्या बैठकीनंतर महाजन यांनी एक किस्सा सांगितला.
जळगाव शहराचे भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाचा उल्लेख केला. एकनाथ खडसे यांना कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबत ‘अमर रहे’च्या घोषणा दिल्याचा किस्सा त्यांनी उपस्थितांसमोर सांगितला. या उल्लेखानंतर सभागृहात उपस्थित पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये हशा पिकला.
हा किस्सा सांगितला जात असताना काही उपस्थितांनी त्याचे चित्रीकरण न करण्याचे आवाहन केल्याचेही सांगितले जाते. मात्र, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्याने त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आगामी काळात या मुद्द्यावरून जळगावातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









