भडगाव तालुक्यात महसूल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू वाहतुकीतील ट्रक, डंपर व ट्रॅक्टर जप्त…!

---Advertisement---

 

भडगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाने मोठी धडक कारवाई करत तीन वाहनांवर जप्तीची कारवाई केली आहे. भडगाव पेठ, महिंदळे आणि वाक या ठिकाणी अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाच्या टास्क फोर्स पथकाने छापेमारी करून एक 16 टायर ट्रक, एक ट्रॅक्टर आणि एक डंपर ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरातील वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहीरे यांच्या आदेशानुसार पाचोरा-भडगाव तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत भडगाव पेठ परिसरातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या 16 टायर ट्रकवर कारवाई करण्यात आली. संबंधित ट्रक जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी भडगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

ही कारवाई मंडळ अधिकारी अनिल निकम यांच्या नेतृत्वाखाली ग्राम महसूल अधिकारी विलास शिंदे, अविनाश जंजाळे, एम. जे. खाटीक, प्रशांत कुंभारे, समाधान हुलहुले, योगेश पाटील, प्रमोद पाटील, महसूल सेवक विशाल सूर्यवंशी, अमोल पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे व पोलीस कर्मचारी प्रवीण परदेशी यांनी संयुक्तपणे केली.

दरम्यान, भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे अवैध वाळू वाहतूक करत असलेल्या एका ट्रॅक्टरवरही महसूल विभागाने कारवाई केली. हा ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. या कारवाईत मंडळ अधिकारी अनिल निकम, ग्राम महसूल अधिकारी प्रमोद पाटील, एम. जे. खाटीक, महसूल सेवक विशाल सूर्यवंशी आणि अमोल पाटील यांनी सहभाग घेतला.

तसेच वाक गावाजवळ अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर कारवाई करण्यात आली. संबंधित डंपर जप्त करून पुढील कारवाईसाठी भडगाव तहसील कार्यालयात ठेवण्यात आला आहे. ही कारवाई मंडळ अधिकारी बी. बी. पाटील, ग्राम महसूल अधिकारी एस. के. मांडोळे, व्ही. पी. शिंदे, प्रमोदसिंग पाटील आणि दीपक पाटील यांनी केली.

अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली असून, जप्त करण्यात आलेल्या वाहनांवर नियमानुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आगामी काळातही अवैध वाळू वाहतुकीविरोधातील मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---