चाळीसगावात मध्यरात्री पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; ४४ सराईत गुन्हेगार ताब्यात, ३९ लाखांची वाहने डिटेन, गुन्हेगारांमध्ये खळबळ….!

---Advertisement---

 

चाळीसगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी चाळीसगाव शहर पोलिसांनी बुधवारी पहाटे विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेत ४४ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून, सुमारे ३९ लाख रुपये किमतीची तीन वाहने डिटेन करण्यात आली आहेत. या धडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी २४ जून रोजी पहाटे २ ते ४ या वेळेत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या दरम्यान रेकॉर्डवरील ८० आरोपींची पडताळणी करण्यात आली. त्यापैकी ४४ आरोपी आढळून आल्याने त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

कारवाईदरम्यान शस्त्रास्त्र कायद्यान्वये (आर्म्स ॲक्ट) एक गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम १२४ अंतर्गत वॅगनआर, ऑडी आणि वरना या तीन वाहनांसह सुमारे ३९ लाख रुपयांचा मुद्देमाल डिटेन करण्यात आला. याशिवाय पोलिसांनी आठ पकड वॉरंटची अंमलबजावणी केली. दारूबंदी कायद्यांतर्गत तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, ६० लिटर गावठी हातभट्टी दारू आणि सुमारे १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. तसेच तीन जणांना समन्स बजावण्यात आले.

ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, गणेश सायकर यांच्यासह एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक, ६० पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि तीन आरसीपी पथकांचा सहभाग होता.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवून अशा प्रकारची विशेष मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कठोर संदेश गेल्याचे मानले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---