---Advertisement---
चार महिन्यांपूर्वी विमान अपघाताच्या घटनेने हादरलेल्या बारामतीत पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रेडबर्ड एव्हिएशन अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी विमान गोजुबाबी गावाच्या हद्दीत कोसळल्याची घटना समोर आली असून सुदैवाने या अपघातात वैमानिक सुरक्षित बचावल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
प्रशिक्षणासाठी उड्डाण केलेले हे शिकाऊ विमान नियमित सराव करत असताना अचानक नियंत्रणाबाहेर गेलं. तांत्रिक बिघाड अथवा इतर कारणामुळे विमानाचा ताबा सुटल्याने ते थेट गावाजवळील मोकळ्या जागेत कोसळल्याचं सांगितलं जात आहे. अपघात होताच परिसरात मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
विमान कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस, प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. परिसरात सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला असून दुर्घटनाग्रस्त विमानाची पाहणी सुरू आहे. वैमानिकाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर येत असली तरी अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.
विशेष बाब म्हणजे, ज्या परिसरात ही दुर्घटना घडली त्याच भागात काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर पुन्हा अवघ्या एक किलोमीटर अंतरावर शिकाऊ विमान कोसळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
या दुर्घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तांत्रिक बिघाड, हवामानातील बदल किंवा मानवी चूक यापैकी कोणत्या कारणामुळे हा अपघात झाला याचा तपास सुरू करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक विभागाकडूनही या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









