---Advertisement---
जळगाव : पारोळा येथे बेकायदेशीररित्या रासायनिक पदार्थांचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली. या छाप्यात तब्बल ९ लाख ३२ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत पारोळा परिसरातील एका गोदामात मोठ्या प्रमाणावर रासायनिक पदार्थ साठवण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व पारोळा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत एम-०४-एफजे-५२२९ क्रमांकाचा टँकर, मोठ्या प्रमाणावर रासायनिक द्रव्य, प्लास्टिक टाक्या, लोखंडी टाक्या, मोटारसायकल, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण ९.३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दिनेश पोपटराव पाटील (रा. पारोळा) याच्याविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









