---Advertisement---
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) शाखा अभियंत्यास ५ लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी ताब्यात घेत गुन्हा दाखल करून अटक केली होती. या अटकेतील आरोपीस रविवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर असे की, तक्रारदार हे सब-कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी जळगाव शहरातील वॉर्ड क्र. १४ विनोबा नगर येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण केले होते. या कामाचे सुमारे ३८ लाख ४९ हजार रुपयांचे बिल अद्याप प्रलंबित होते. हे थकीत बिल मंजूर करण्याच्या बदल्यात शाखा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे यांनी सुरुवातीला १८ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम १५ लाख रुपये ठरवण्यात आली. यामध्ये स्वतःसाठी ७ लाख ५०हजार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ७ लाख ५० हजार रुपये देण्याचे अहिरे यांनी मान्य केले होते.
लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये दि.९ मे २०२६ रोजी देण्याचे ठरले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी करून जळगाव सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरात सापळा रचला. योगेश अहिरे यांनी आपल्या निळ्या रंगाच्या बलेनो कारमध्ये (एम.एच.-१९ /सी.व्ही.-२६१९) बसून ५ लाख रुपयांची लाच स्वीकारली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले होते.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा आवतारे आणि त्यांच्या पथकाने केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून आरोपी योगेश अहिरे यांना अटक करण्यात आली होती.या अटकेतील आरोपीस दि. १० मे २०२६ रविवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता १२/५/२०२६ पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.









