भुसावळच्या दूषित पाणीपुरवठ्याची उच्चस्तरीय चौकशी करा; देवेंद्र वराडे यांची पाणीपुरवठा मंत्र्यांकडे मागणी….!

---Advertisement---

 

अमृत योजनेतील १०० कोटींच्या कामांचे विशेष ऑडीट करण्याची मागणी; नाहाटा चौफुली जलकुंभाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह

भुसावळ शहरातील दूषित आणि अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, अमृत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत झालेल्या १०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी आणि विशेष लेखापरीक्षण (ऑडीट) करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र सुरेखा मधुकर वराडे यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात भुसावळ नगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना १४ ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असून, येणारे पाणी दूषित आणि अस्वच्छ असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

वराडे यांनी विशेषतः नाहाटा चौफुली परिसरातील जलकुंभाचा मुद्दा उपस्थित केला आहे. या जलकुंभाची अनेक वर्षांपासून स्वच्छता करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यामध्ये हिरवे, दूषित व जंतूयुक्त पाणी साचल्याचे म्हटले आहे. याच जलकुंभातून नागरिकांना पाणीपुरवठा होत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच जलकुंभाची रचना अत्यंत जीर्ण अवस्थेत असून ती धोकादायक बनली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित जलकुंभाची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

भुसावळ शहरात शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्यासाठी अमृत योजनेअंतर्गत १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र एवढा निधी खर्च होऊनही शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्याच्या समस्या कायम असल्याने निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

नवीन जलकुंभ, वितरण व्यवस्था आणि इतर कामे अद्याप पूर्णत्वास न गेल्याचा दावा करत या संपूर्ण योजनेचे स्वतंत्र चौकशी समितीमार्फत परीक्षण करण्यात यावे आणि खर्चाचा तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

देवेंद्र वराडे यांनी निवेदनाद्वारे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत :

  • नाहाटा चौफुली येथील जीर्ण जलकुंभाची तातडीने तांत्रिक तपासणी करावी.
  • जलकुंभाची स्वच्छता करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा.
  • दूषित पाणीपुरवठ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
  • अमृत योजनेच्या निधीचे विशेष ऑडीट व स्वतंत्र चौकशी करावी.
  • मंजूर, पूर्ण व प्रलंबित कामांचा तपशील सार्वजनिक करावा.
  • भुसावळकरांना नियमित आणि वेळेवर पाणीपुरवठा सुनिश्चित करावा.

भुसावळकर नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर विषय असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी देवेंद्र वराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---