देवदर्शनकरून परतत असताना भीषण अपघात; २ महिलांचा जागीच मृत्यू, ३ ते ४ जण जखमी, परिसरात हळहळ…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर-बोदवड मार्गावर मालदाभाडी गावाजवळ सोमवारी झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ट्रॅक्स आणि कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेमुळे हा अपघात घडला.

अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार देवदर्शनकरून नाशिककडून बोदवडकडे जात होती. दरम्यान मालदाभाडी गावाजवळ कार आणि ट्रॅक्स यांच्यात समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना वाहनातून बाहेर काढून तातडीने जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मृतदेहही पुढील प्रक्रियेसाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

या दुर्घटनेत सातपूर, नाशिक येथील चंद्रकला सूर्यकांत माळी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच आणखी एका महिलेचाही मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती मिळाली असून तिची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

अपघातात जखमी झालेल्या तीन ते चार जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून वेग, रस्त्याची स्थिती किंवा अन्य तांत्रिक कारणांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---