राजस्थानमधील दोन वर्षांपासून पोलिसांच्या रडारवर असलेला अमली पदार्थ प्रकरणातील फरार आरोपी पाचोऱ्यातून जेरबंद…!

---Advertisement---

 

राजस्थान राज्यामधील दोन कोटी रुपयांच्या अमली पदार्थ प्रकरणात मागील दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पाचोरा पोलिसांनी शिताफीने अटक करून राजस्थानच्या सरणा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या कारवाईमुळे पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

पाचोरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान मधील अजमेर जिल्ह्यातील सरणा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ तस्करी केल्याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गोविंद शंभुनाथ (वय २७, रा. बनका खेडा, ता. कोठली, जि. भिलवाडा, राजस्थान) हा मागील दोन वर्षांपासून फरार होता.

सरणा पोलीस ठाण्याकडून आरोपीचा फोटो आणि त्याच्याबाबतची माहिती पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना देण्यात आली होती. त्यानुसार जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक फौजदार विलास पाटील, पोलीस कर्मचारी योगेश पाटील आणि गणेश कुवर यांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी पाचोरा शहरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.

या विशेष पथकाने रविवारी सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. अटक झाल्यानंतर त्याला राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीविरुद्ध राजस्थानमधील अजमेर आणि चित्तौडगड परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अमली पदार्थ तस्करीशी संबंधित या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे.

या कारवाईदरम्यान प्रभुलाल शर्मा यांचेही सहकार्य लाभल्याची माहिती पोलिसांनी दिली. परराज्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात यश आल्याने राजस्थान पोलिसांनी पाचोरा पोलीस दलाचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---