---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अकुलखेडा गावात प्रेमसंबंधातून घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गावठी पिस्तूलातून गोळी झाडून महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकराने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अकुलखेडा येथील जगदीश काशिनाथ पाटील यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. घरात अनिता जगदीश पाटील आणि देवा सुरेश धनगर हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आले. सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास पाटील दाम्पत्याची मुलगी शाळेतून घरी परतली असता तिला घरात हे भीषण दृश्य दिसले. आई आणि एक पुरुष व्यक्ती रक्ताने माखलेल्या अवस्थेत निश्चल पडलेले पाहून तिने हंबरडा फोडत शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राथमिक तपासात अनिता पाटील आणि देवा धनगर यांच्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख होऊन प्रेमसंबंध प्रस्थापित झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपासून अनिता या देवा धनगर यांना वेळ देत नसल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. संतापाच्या भरात देवा धनगर हा अकुलखेडा येथील तिच्या राहत्या घरी आला आणि त्याने गावठी पिस्तूलातून अनिता यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
घटनास्थळी देवा धनगर यांची दुचाकी आढळून आली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
या घटनेमुळे अकुलखेडा गावात भीती आणि शोककळा पसरली आहे. सोशल मीडियातून जुळलेल्या नात्याचा असा भयावह शेवट झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अधिकृत अहवालानंतरच संपूर्ण घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.









