---Advertisement---
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील हॉटेल आस्वाद परिसरात बुधवारी (दि. ११ मार्च) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात ज्ञानेश्वर भोई (वय अंदाजे ६५, रा. भोईवाडा, वरणगाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर भोई हे हॉटेल आस्वाद परिसरातून जात असताना अज्ञात हल्लेखोराने अचानक त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार वार केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. हल्ल्यानंतर ते रस्त्यावरच गंभीर अवस्थेत कोसळले.
काही वेळाने परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत भोई यांना मदत केली. त्या वेळी रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याने ते एखाद्या बस किंवा चारचाकी वाहनाखाली येऊन अपघात होण्याची शक्यता होती; मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
त्यानंतर उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी भोई यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात हलवले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे वरणगाव परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडील काळात परिसरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.परिसरात पोलिसांनी गस्त वाढवून कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला असल्याची माहिती मिळत आहे.









