---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत भोपालमध्ये गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीला अटक केली आहे. बसस्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करत असताना आरोपीला गावठी पिस्टलसह जेरबंद करण्यात आले असून या कारवाईमुळे एक मोठा गुन्हा टळल्याचे मानले जात आहे.
भुसावळ बसस्थानकाजवळील रिक्षा स्टँड परिसरात एक इसम अवैध शस्त्रासह फिरत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार बाजारपेठ पोलिसांच्या डी.बी. पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल (कट्टा) आणि मॅगझीन जप्त करण्यात आले.
तपासात आरोपीचे नाव शादाब रईस कुरेशी (वय ३५, रा. भोपाळ) असे समोर आले. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपीबाबत अधिक माहिती घेतली असता धक्कादायक बाब समोर आली. तो भोपालमधील अशोका गार्डन पोलीस स्टेशन हद्दीत १४ मार्च रोजी एका व्यक्तीवर गोळीबार करून फरार झाला होता. या घटनेनंतर तो पोलिसांच्या रडारवर होता.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती भोपाल पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा उघडकीस येण्यापूर्वीच रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.









