---Advertisement---
रावेर शहरातील मध्यवर्ती असलेल्या रामबाग परिसरात घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नगरसेवक दिलीप हिरामण पाटील यांच्या राहत्या घरालाच अज्ञात चोरट्यांनी टार्गेट करत मध्यरात्री मोठी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही घटना गुढीपाडव्याच्या रात्री घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश करत खिडकीचे लोखंडी गज कापले आणि अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी थेट कपाट गाठत रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. धक्कादायक बाब म्हणजे ही संपूर्ण घटना घडत असताना दिलीप पाटील आणि त्यांचे कुटुंबीय घरातच झोपलेले होते, मात्र चोरट्यांनी इतक्या सफाईने ही चोरी केली की कुणालाही त्याचा थांगपत्ता लागला नाही.
आज सकाळी उठल्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच दिलीप पाटील यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ठसे तज्ञ आणि श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे ही चोरी पोलीस ठाण्यापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर घडली आहे. त्यामुळे चोरट्यांचा धाडस आणि पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शहराच्या मध्यभागी, लोकवस्तीच्या ठिकाणी अशा प्रकारची चोरी होणे ही नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.
या घटनेनंतर रावेर शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक कडक करावी, अशी मागणी केली आहे. सध्या पोलीस विविध कोनातून तपास करत असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. मात्र या धाडसी चोरीमुळे शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.









