भुसावळ हादरलं! साकरीत तरुणाला अमानुष मारहाण करून विहिरीत फेकलं; पोलिसालाही धक्काबुक्की…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 23 वर्षीय तरुणाला संशयाच्या भरात बेदम मारहाण करून विहिरीत फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. एवढंच नाही, तर मदतीला धावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यालाही आरोपींनी धक्काबुक्की केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचा पाठलाग केल्याच्या संशयावरून 7 ते 8 जणांच्या टोळक्याने संबंधित तरुणाला गाठले. सुरुवातीला त्याला शिवीगाळ करण्यात आली, त्यानंतर लाकडी दांडके आणि फावड्यासारख्या धारदार साधनांनी त्याच्यावर तुटून पडत बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

मारहाणीवरच समाधान न मानता, आरोपींनी जखमी अवस्थेतील त्या तरुणाला जवळच्या विहिरीत फेकून देत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला. मात्र संतप्त आरोपींनी त्यालाही न जुमानता धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

काही दिवसांपूर्वीच भुसावळमध्ये एका तरुणाला विवस्त्र करून खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना ताजी असताना, साकरीतील हा प्रकार समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात 8 आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरुणाला गंभीर दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण करणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून, दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

साकरीतील या अमानुष घटनेमुळे भुसावळ तालुका पुन्हा एकदा हादरला असून, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे. नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत भीतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---