---Advertisement---
अमळनेर शहर पुन्हा एकदा एका भीषण अपघात झाला आहे. शहरातील सिंधी कॉलनी परिसरात शुक्रवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेत ७२ वर्षीय जयराम धर्मानी यांचा क्रेनच्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जयराम धर्मानी हे नेहमीप्रमाणे बाजारातून आपल्या घरी परतत होते. ते पायी चालत सायकल हातात घेऊन जात असताना मागून वेगात येणाऱ्या क्रेनने त्यांना अचानक धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की धर्मानी यांना सावरण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. अपघाताचे भीषण स्वरूप पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. सिंधी समाजासह परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत निषेध नोंदवला.
नागरिकांच्या मते, अमळनेर-चोपडा मार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे असून आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाहीत. त्यामुळे जड वाहनांचा वेग अनियंत्रित राहतो आणि अशा अपघातांना आमंत्रण मिळते.
विशेष म्हणजे, हा एकमेव अपघात नसून गेल्या काही दिवसांत अमळनेरमध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच भरधाव रेती डंपरने घनश्याम पाटील या तरुणाचा बळी घेतला होता. त्याआधीही अनेक दुचाकीस्वारांना गंभीर अपघातांना सामोरे जावे लागले होते. तरीदेखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अमळनेर शहरातून दिवस-रात्र जड वाहनांची बेफाम वाहतूक सुरू असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. नियमांचे पालन होत नसल्यामुळे सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. विशेषतः अरुंद रस्ते, खराब पायाभूत सुविधा आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाचा निषेध करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर उभारणे, जड वाहनांवर नियंत्रण आणणे आणि अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई करणे या मागण्या जोर धरत आहेत.
दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत असून घटनेची नोंद घेण्यात आली आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे, आणखी किती निष्पाप जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार? नागरिकांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर अमळनेरमध्ये अशा अपघातांची मालिका थांबणार नाही आणि परिस्थिती आणखी भयावह होऊ शकते.









