---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात खत विक्रीतील अनियमितता आणि शेतकऱ्यांची लूट केल्याच्या तक्रारींवरून कृषी विभागाने मोठी कारवाई करत अनेक विक्रेत्यांवर कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईत दोन खत विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, कासोदा (ता. एरंडोल) येथील एका सहकारी संस्थेसह अन्य दहा व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच एका परवानाधारकाला कडक ताकीद देण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील खत विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
कृषी विभागाच्या पथकाने अचानक तपासणी मोहीम राबवली असता अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्या. काही ठिकाणी खताचा साठा अधिकृत नोंदीत दाखवण्यात आलेला नव्हता, तर काही विक्रेत्यांनी दरपत्रक लावले नव्हते. याशिवाय शेतकऱ्यांना खत उपलब्ध नसल्याचे सांगून त्यांच्याकडून जादा दराने पैसे उकळले जात असल्याचेही निदर्शनास आले. या सर्व प्रकारांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कृषी विभागाने तातडीने कारवाई केली.
युरिया टंचाईच्या तक्रारीनंतर विशेषत: कासोदा परिसरात मोठी धाड टाकण्यात आली. या कारवाईत सहा दुकानांमधून तब्बल ३४१८ गोण्यांचा युरिया साठा जप्त करण्यात आला. शेतकऱ्यांना “युरिया उपलब्ध नाही” असे सांगून प्रत्यक्षात साठा लपवून ठेवत जास्त दराने विक्री केली जात असल्याचे या धाडीतून उघड झाले. त्यामुळे या प्रकरणाकडे अत्यंत गंभीरतेने पाहत संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, कृषी विभागाने सर्व विक्रेत्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. रब्बी हंगाम संपत आला असला तरी खत विक्रीत कोणतीही अनियमितता सहन केली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युरिया किंवा इतर खते खरेदी करताना आधार कार्ड सोबत ठेवणे बंधनकारक असून, आधार लिंक करूनच खरेदी करावी. तसेच कोणते खत किती प्रमाणात घेतले याची खात्री करून घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांनी कुठेही गैरव्यवहार आढळल्यास तात्काळ कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.









