---Advertisement---
Strait of Hormuz संदर्भात इराणने मोठा धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. इराणच्या संसदेत सादर करण्यात आलेल्या एका ड्राफ्टनुसार, या सामुद्रधुनीतून इंधन वाहतूक करणाऱ्या जहाजांकडून “सागरी सुरक्षेच्या हमी”साठी टोल वसूल करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रस्तावानुसार, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांना टोल भरावा लागू शकतो. Al जाझीरा ने दिलेल्या वृत्तानुसार, या निर्णयामुळे जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये चिंता वाढली आहे. कारण जगातील मोठ्या प्रमाणावर तेल आणि गॅस वाहतूक याच मार्गाने केली जाते.
इराण यापूर्वी काही निवडक देशांना, विशेषतः चीन सारख्या देशांना, या मार्गाचा वापर करण्यास परवानगी देत होता. मात्र परवानगीशिवाय जाणाऱ्या जहाजांवर हल्ले करून इशारे देण्याची भूमिका इराणने घेतल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे या नव्या धोरणामुळे जागतिक व्यापारावर ताण वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, युनाइटेड स्टेट्स आणि इराण यांच्यात तणाव कायम असून, युद्धविरामाच्या चर्चांनंतरही अधूनमधून हल्ले सुरूच असल्याचे वृत्त आहे. इस्राएल कडून इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याचेही समोर आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी अशा कारवायांना मंजुरी दिल्याचे सांगितले जात आहे.
या संघर्षात इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब यांचा मृत्यू झाल्याचेही इराणने मान्य केले आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.
एकीकडे इराणने सुमारे 10 लाख सैन्य सज्ज केल्याचा दावा केला जात आहे, तर दुसरीकडे अमेरिकेने आखातात लष्करी हालचाली वाढवल्या आहेत. यामुळे येत्या काळात जमिनीवरील युद्धाची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या लष्करी ठिकाणांवर कारवाई केल्याचा दावा करत इराण कमकुवत झाल्याचे म्हटले आहे. मात्र इराण अजूनही माघार घेण्यास तयार नसल्याने हा संघर्ष लवकर थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.
एकूणच, होर्मुझ सामुद्रधुनीवरील संभाव्य टोल निर्णय आणि सुरू असलेला संघर्ष यामुळे जागतिक इंधन बाजारात अस्थिरता वाढण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम महागाईवर होऊ शकतो.









