ट्रॅक्टरमध्ये कचऱ्या ऐवजी माती भरल्याचा भांडाफोड

---Advertisement---

 

नगरसेवकांसह उपमहापौरांचा बीव्हीजीवर प्रचंड रोष

शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावतांना ट्रॅक्टरमध्ये कचऱ्या ऐवजी माती भरली जात असल्याचा भांडाफोड नगरसेवकांसह उपमहापौरांनी सोमवारी झालेल्या महासभेत करीत बीव्हीजी या मक्तेदाराविरूध्द प्रचंड रोष व्यक्त केला. दरम्यान ट्रॅक्टरमध्ये माती भरणाऱ्यांविरूध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिले.


महापालिकेच्या पहिल्याच महासभेत शहरातील अस्वच्छतेचा विषय चांगलाच गाजला. नगरसेवक नितीन बरडे यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी उदय पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. बीव्हीजीचे कर्मचारी ट्रॅक्टरमध्ये वजन वाढण्यासाठी कचऱ्या ऐवजी माती भरत असल्याचे 127 फोटो आणि व्हिडीओ थेट उपायुक्तांना मोबाईलवर पाठविल्याचे सांगत काटा मारण्याचा भांडाफोड केला. बीव्हीजीला 1400 रूपये प्रतिटन कचऱ्याचे पेमेंट महापालिकेकडून दिले जाते. असे असतांना ट्रॅक्टरवाले घोळ करीत आहेत. तसेच ट्रॅक्टरची पासिंग ही दीड ते तीन टनापर्यंतची असतांना ट्रॅक्टरमध्ये पाच टन कचरा येतोच कसा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शहरातील एमआयडीसीतून 100 टन कचरा गोळा केल्याचा सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र एवढा कचरा आहे तरी का?


अधिकाऱ्यांचे संगनमत
नगरसेवक नितीन बरडे यांनी ट्रॅक्टरमध्ये कचऱ्याऐवजी माती भरण्याच्या या प्रकारात अधिकाऱ्यांचे संगनमत असून मोठा गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या सर्व प्रकारात कुणाची भांडवली आहे, हे सिध्द करून दाखवेल असा इशारा त्यांनी दिला. समता नगरात घंटागाडी येत नसल्याची तक्रारही त्यांनी केली. याठिकाणी घंटागाडी सुरू न झाल्यास आमच्या खर्चाने कचरा उचलून आयुक्तांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर आणून टाकू असा इशाराही बरडे यांनी दिला.


उपमहापौरांनीही घेतला समाचार

महापालिकेच्या आरोग्य विभागावर चौफेर बाजूंनी टीका होत आहे. मनपाने स्वच्छतेचा मक्ता बीव्हीजी कंपनीला दिला असून ही कंपनी देखील माती भरण्याचे प्रकार करीत असेल तर ती गंभीर बाब असल्याचे सांगत उपमहापौर मनोज चौधरी यांनी अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. तसेच मक्तेदाराला केवळ दंड करून चालणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असेही त्यांनी सांगितले. यावेळी सभागृह नेते नितीन लढ्ढा यांनी जोपर्यंत ट्रॅक्टर बंद होत नाही तोपर्यंत हे प्रकार सुरूच राहतील असे सांगितले.


माती भरणाऱ्यांविरूध्द गुन्हे नोंदवा

बीव्हीजी मक्तेदाराविरूध्द नगरसेवकांचा रोष लक्षात घेता आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी संबंधित कंपनीला मोठी वाहने घेण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सांगितले. तसेच जे ट्रॅक्टरचालक वाहनात माती भरत असतील अशांवर गुन्हे दाखल करून त्यांचे काम बंद करण्याचे आदेशही आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---