---Advertisement---
तायडे कुटुंबीयांच्या महार वतन जमीन प्रकरणात दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा हा पूर्णपणे राजकीय षड्यंत्र असून, केवळ मला छळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी पोलिसांवर दबाव आणला आहे, असा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केला. या अन्यायाविरुद्ध आणि खोटा गुन्हा रद्द करण्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाद मागणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जळगावातील मुक्ताई निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खडसे म्हणाले, ज्या जमिनीशी माझा थेट संबंध नाही, मी ती जमीन खरेदी केली नाही. एवढेच नव्हे तर ती जमीन वर्ग १ ची आहे. तरी त्यावर २३-२४ वर्षांनंतर अचानक तक्रार केली जाते. २९ पैकी २८ जमीनधारकांची तक्रार नाही, मग एकालाच आता आठवण कशी झाली? पोलिसांनी साधी चौकशी न करता रात्री १२ वाजता घाईघाईने गुन्हा दाखल केल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
नखातेंचे सीडीआर तपासा
अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, तक्रारदार चमेली तायडे आणि अनिल अडकमोल यांचे सीडीआर तपासावे, म्हणजे पडद्यामागचे राजकीय सूत्रधार कोण आहेत हे समोर येईल. कारण, स्थानिक पोलिस आणि पोलिस अधीक्षक गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते, मात्र अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्यावर राजकीय बळाचा दबाव टाकून त्यांना गुन्हा दाखल करण्यास सांगण्यात आल्याचाही आरोप खडसेंनी केला.
मंत्री महाजनांनी अपात्र होऊ या भीतीपोटी जागा परत केली…
गिरीश महाजन हे दानशूर व्यक्ती नाही, तर निवडणुकीत अपात्र ठरण्याच्या भीतीने जमीन परत केली आहे. आजही कारखान्यावर त्यांचे नाव संचालक म्हणून कायम असल्याचेही खडसेंनी सांगितले.
खून, टोळीयुद्ध वाढले पोलिसांचे तिकडे लक्ष नाही
जिल्ह्यात खून आणि टोळीयुद्ध वाढत असताना पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे, मात्र विरोधकांना अडकवण्यात सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे पोलिस तत्परता दाखवत आहेत. या प्रकरणाची एसआयटी नेमा किंवा सीबीआय चौकशी करा, मी नियमबाह्य काम करत नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले.









