---Advertisement---
पुण्यातील कोंढवा परिसरात संपत्तीसाठी जावयाने स्वतःच्या सासू-सासऱ्यांवर काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नी परत घरी यावी आणि सासरची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आपल्या नावावर व्हावी या उद्देशाने आरोपीने मध्यरात्री कबरस्तानात जाऊन अघोरी पूजा केल्याचे समोर आले आहे.
ही घटना १९ मे रोजी रात्री सुमारे १२:२० वाजेच्या सुमारास कौसरबाग येथील कबरस्तानात घडली. याप्रकरणी परवेज अब्दुल अजीज मेमन याच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात हसनेन रफिक जाफरानी यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी परवेज याचे पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू होते आणि ती सध्या त्याच्यापासून वेगळी राहत होती. पत्नी पुन्हा घरी यावी तसेच सासरची संपत्ती मिळावी या हेतूने त्याने काळ्या जादूचा आधार घेतल्याचे समोर आले आहे.
घटनेच्या रात्री परवेज हा कौसरबाग कबरस्तानात गेला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांना कबरस्तानात संशयास्पद हालचाली सुरू असल्याचा संशय आला. नागरिकांनी आत जाऊन पाहिले असता आरोपी काही फोटोंवर सुया टोचून अघोरी पूजा करत असल्याचे दिसून आले. त्या फोटोंमध्ये त्याचे सासू-सासरे, मेव्हणा आणि मेव्हण्याच्या पत्नीचे फोटो असल्याची माहिती समोर आली आहे.
यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून त्याला जाब विचारला. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र त्याच्याकडील साहित्य आणि फोटो पाहून संपूर्ण प्रकार उघड झाला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
या घटनेनंतर कोंढवा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असतानाही अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.









