---Advertisement---
मुलीच्या जेईई (JEE) प्रवेश परीक्षेच्या ऑनलाइन शिक्षणाचे आणि अभ्यासक्रमाच्या नोट्स उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत अमळनेर येथील एका महिलेची तब्बल २२ लाख ७५ हजार १३७ रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात पाच जणांसह संबंधित लिंक व नेटवर्क चालवणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर शहरातील राजाराम नगर येथील ज्योती विनोद सोनार यांच्या मुलीच्या शिक्षणाच्या निमित्ताने हा फसवणुकीचा प्रकार घडला. २९ ऑक्टोबर २०२४ ते २ जून २०२६ या कालावधीत आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे.
फिर्यादींची मुलगी सेंट मेरी शाळेत शिक्षण घेत असताना तिचा मोबाईल क्रमांक आणि इतर माहिती मिळवून सचिन राठोड याने संपर्क साधला. त्याने ऑनलाइन बैठक घेऊन जेईई क्लासमध्ये प्रवेश देण्याचे आश्वासन दिले आणि लिंक पाठवून सुरुवातीला १ लाख ९ हजार ५०० रुपये स्वीकारले.
यानंतर क्लासची एकूण फी अडीच लाख रुपये असून हॉस्टेल व मेस शुल्क वेगळे असल्याचे सांगण्यात आले. शरद पवार नावाच्या व्यक्तीने उर्वरित रक्कम हप्त्यांमध्ये भरण्याचा सल्ला दिला. संशय येऊ नये म्हणून दुसऱ्या विद्यार्थ्याचा आयडी वापरून मुलीला ऑनलाइन क्लासमध्ये सहभागी करण्यात आले. मात्र वर्ग नियमित होत नसल्याने आणि अभ्यासाच्या नोट्स मिळत नसल्याने फिर्यादींना संशय आला.
गणेश कुमार मीना याने स्वतःला अधिकारी असल्याचे भासवत संपर्क साधला. आधी झालेली फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्याचे आश्वासन देत त्याने वर्दीतील छायाचित्रे, ओळखपत्रे आणि बैठकींचे फोटो पाठवून विश्वास संपादन केला. त्यानंतर अनुज कुमार, प्रदीप कुमार मीना आणि इतरांनी खाते अपडेट, खाते बदल तसेच विविध तांत्रिक कारणे सांगत वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधून फोन-पेच्या माध्यमातून आणखी मोठ्या प्रमाणात रक्कम उकळली.
या संपूर्ण व्यवहारात फिर्यादींकडून एकूण २२ लाख ७५ हजार १३७ रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. ऑनलाइन शिक्षण, प्रवेश प्रक्रिया किंवा फी भरण्याच्या नावाखाली येणाऱ्या अनोळखी कॉल, लिंक आणि संदेशांबाबत नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.









