सोनं-चांदी देऊनही फ्लॅट खरेदीसाठी १० लाख रुपयांची मागणी; विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ, सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल…

---Advertisement---

 

पारोळा तालुक्यात हुंड्यासाठी एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नात लाखो रुपयांचा खर्च आणि सोन्या-चांदीचे दागिने दिल्यानंतरही मुंबईत फ्लॅट खरेदीसाठी आणखी १० लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेला सातत्याने त्रास देण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित संन्या ऊर्फ पूजा विलास राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा विवाह २४ एप्रिल २०२३ रोजी विलास अजमल राठोड यांच्याशी पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला होता. विवाहावेळी मुलीच्या कुटुंबाकडून १५ ग्रॅम सोन्याची चैन, सोन्याची अंगठी, चांदीचे साहित्य तसेच ५ लाख रुपये रोख देण्यात आले होते.

लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र त्यानंतर पती, सासू, सासरे आणि दीर यांनी मुंबईत फ्लॅट खरेदीसाठी माहेरहून आणखी १० लाख रुपये आणण्याचा तगादा लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. मागणी पूर्ण न झाल्याने विवाहितेला वारंवार मानसिक त्रास देण्यात आला. तसेच पतीकडून दारूच्या नशेत मारहाण केली जात असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय उपाशी ठेवणे, अपमानास्पद शब्दांत हिणवणे आणि माहेरच्या कुटुंबाबद्दल अवमानकारक वक्तव्य करणे असे प्रकार सातत्याने घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिस्थिती गंभीर होत गेल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे मिळत नसतील तर मुलीला नांदवणार नाही, अशी भूमिका सासरच्या मंडळींनी घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सततच्या छळाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात हुंडा छळवणूक, मारहाण आणि संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---