क्रिकेटच्या वादातून भुसावळात थरारक हाणामारी; बाप-लेकावर बॅटने हल्ला, तिघांविरोधात गुन्हा….!

---Advertisement---

 

भुसावळ शहरातील वांजोळा रोड परिसरात क्रिकेट खेळण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाने भीषण रूप धारण करत थेट हाणामारीपर्यंत मजल मारली. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांनी मिळून बाप-लेकावर क्रिकेटच्या बॅटने आणि हातातील कड्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.ही घटना १४ मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लक्ष्मी नगर परिसरात घडली. याप्रकरणी सोमवारी (दि. १६ मार्च) सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळ रवींद्र बारी (वय ४०) हे आपल्या कुटुंबियांसह लक्ष्मी नगर, वांजोळा रोड येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुलगा ध्रुव आणि आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता. याच जुन्या वादाचा राग मनात ठेवून आरोपींनी थेट बारी यांच्या घरासमोर येत गोंधळ घातला.

आरोपी उमेश विकास धनगर, ओम विकास धनगर आणि रंजना विकास धनगर यांनी संगनमत करून गोपाळ बारी, त्यांचा मुलगा ध्रुव आणि वडील रवींद्र बारी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी त्यांनी क्रिकेटची बॅट आणि हातातील कड्याचा वापर करून बेदम मारहाण केल्याने तिघे जखमी झाले. इतकेच नव्हे, तर “तुमच्या मुलाला मारून टाकू” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी गोपाळ बारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र पाटील करीत आहेत.

दरम्यान, किरकोळ कारणावरून एवढ्या मोठ्या हाणामारीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---