---Advertisement---
भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात अवैध तंबाखू आणि पानमसाल्याच्या वाहतुकीवर मोठी कारवाई करत लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाने पठाणकोट एक्सप्रेसमधून तब्बल अडीच लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अप 11058 पठाणकोट एक्सप्रेसमधून मोठ्या प्रमाणावर गुटखा भुसावळमार्गे मनमाड-मुंबईकडे नेला जात असल्याची गुप्त माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली होती. यानंतर तातडीने लोहमार्ग पोलिसांना सतर्क करण्यात आले आणि संयुक्त पथकाने सापळा रचला.
लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजयसिंग चव्हाण, धनराज लुले, चव्हाण, जाधव, मिर्झा तसेच RPF चे एएसआय दीपक कवले, आरक्षक नरेंद्र कुमार गौतम आणि कपिलकुमार यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर कारवाई केली.
प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आलेल्या पठाणकोट एक्सप्रेसच्या इंजिनाजवळील जनरल डब्याची झडती घेतली असता 17 मोठ्या बॅगा संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या. या बॅगांची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा साठा आढळला.
प्रवाशांकडून चौकशी केली असता या बॅगा सुनील शिवनारायण मालाकर (वय 42, शिवाजीनगर, लालबाग, बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) याच्या असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
आरोपीच्या ताब्यातून एकूण 17 बॅगांमध्ये विविध ब्रँडचा गुटखा जप्त करण्यात आला. यामध्ये प्रीमियम रजनीगंधा, डायरेक्टर स्पेशल, जाफराणी जर्दा, विमल पानमसाला आणि व्ही-1 टोबॅको यांसारख्या प्रकारांचा समावेश असून, एकूण जप्त मालाची किंमत सुमारे 2 लाख 53 हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी लोहमार्ग पोलीस हवालदार महेश धनराज पराते यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने सर्व बॅगा स्वतःच्या मालकीच्या असल्याची कबुली दिल्यामुळे पुढील कारवाई सुलभ झाली आहे.
दरम्यान, जप्त केलेल्या गुटख्यातील काही नमुने अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गुटखा आणि काही पानमसाल्यावर बंदी असून त्यांची विक्री आणि वाहतूक करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, अशा बेकायदेशीर कृत्यांपासून दूर राहावे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे. ही कारवाई रेल्वे परिसरातील सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.









