---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढे गेल्याने उष्णतेचा कडाका चांगलाच जाणवू लागला आहे. वाढत्या उन्हामुळे जळगावकर हैराण झाले असून याचा परिणाम आता जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यावरही दिसू लागला आहे.
१२ मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार जळगाव जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये एकूण ५९.६४ टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे. मात्र जिल्ह्यातील महत्त्वाचे गिरणा धरणातील जलसाठा आता ५० टक्क्यांखाली आला आहे. त्यामुळे आगामी चार महिन्यांच्या कालावधीत नागरिकांना पाण्याचा वापर अधिक सावधपणे करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षी मान्सून काळात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. त्यानंतर डिसेंबर महिन्यापर्यंत अवकाळी पावसानेही हजेरी लावल्यामुळे भोकरबारी वगळता जवळपास सर्वच प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा निर्माण झाला होता. गिरणा धरणातून सिंचनासाठी तीन आवर्तन सोडल्यानंतर जलसाठ्याची पातळी सुमारे सत्तरीच्या घरात आली होती. मात्र मागील काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढू लागले आणि त्यामुळे गिरणा धरणातील जलसाठा कमी होऊन तो ५० टक्क्यांखाली आला आहे.
दरम्यान, जळगावकरांसाठी काहीसा दिलासादायक बाब म्हणजे वाघूर प्रकल्पामध्ये सध्या सर्वाधिक जलसाठा उपलब्ध आहे. वाघूर धरणात सध्या सुमारे ८३. ८६ टक्के इतका पाणीसाठा आहे. या धरणातूनही सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले असले तरी पाण्याचा पुरेसा साठा असल्याने यंदा जळगाव शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रकल्पनिहाय जलसाठ्याच्या आकडेवारीकडे पाहिल्यास…..
हतूनर प्रकल्पात ६०.७८ टक्के,
गिरणा धरणात ४९.०९ टक्के,
वाघूरमध्ये ८३.८६ टक्के,
मन्याडमध्ये ४८.७२ टक्के,
बोरी प्रकल्पात ३१.७१ टक्के,
भोकरबारीमध्ये ४८.९९ टक्के,
सुकी प्रकल्पात ८१.४६ टक्के,
अभोरा ७९.८० टक्के,
अग्नावती ६६.९८ टक्के,
तोंडापूर ५६.०९ टक्के,
हिवरा प्रकल्पात ३५.९२ टक्के,
मंगरुळ प्रकल्पात ६५.८८ टक्के,
बहुळा ६०.८४ टक्के,
मोर प्रकल्पात ७३.३७ टक्के,
अंजनीमध्ये ६७.९१ टक्के,
गूळ प्रकल्पात ७०.५९ टक्के,
शेळगाव बॅरेजमध्ये ७०.६७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
एकूणच वाढत्या तापमानामुळे पुढील काही महिन्यांत धरणांमधील पाणीसाठ्यावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करणे आणि पाणी वाचवण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.









